नवी दिल्ली : वृत्तसंस्था । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी जितिन प्रसाद यांच्या भाजपामध्ये प्रवेश करण्यावर टीका करतानाच पक्षनेतृत्वालाही सूचक इशारा दिला आहे.
बुधवारी सकाळी काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावरून राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले असून ज्योतिरादित्य सिंदिया, जितिन प्रसाद यांच्यानंतर आता सचिन पायलट यांचा नंबर लागणार का? अशी देखील विचारणा होऊ लागली आहे.
“दुसऱ्यांचं ऐकल्याशिवाय काहीही टिकू शकत नाही. कॉर्पोरेट व्यवस्था देखील जगू शकत नाही. राजकीय पक्षांचं देखील तसंच आहे. तुम्ही जर ऐकलं नाहीत, तर तुमच्यावर वाईट परिस्थिती ओढवेल”, असं कपिल सिब्बल म्हणाले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसवर आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
जितिन प्रसाद हे युपीए-२ च्या काळात केंद्रीय मंत्री देखील राहिले आहेत. काँग्रेसमधील कार्यप्रणाली आणि पक्षनेतृत्व बदलाविषयी २०१९मध्ये आवाज उठवणाऱ्या जी-२३ गटामध्ये त्यांचा समावेश होता. त्यांच्याप्रमाणेच कपिल सिब्बल देखील त्या गटामध्ये होते. त्यामुळे कपिल सिब्बल यांनी जितिन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसला दिलेला घरचा आहेर महत्त्वाचा मानला जात आहे.
यावेळी कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षनेतृत्वाचे अप्रत्यक्षपणे कान टोचले आहेत. “मला खात्री आहे की नेतृत्वाला हे माहितीये की नेमकी समस्या काय आहे. माझी आशा आहे की नेतृत्व लोकांचं ऐकेल. कारण ऐकल्याशिवाय काहीही तग धरू शकत नाही. पक्षांतर्गत समस्यांचं निराकरण केलं गेलं नाही हे खरं आहे. या समस्यांची शक्य तितक्या लवकर दखल घेतली गेली पाहिजे. आम्ही सातत्याने या अडचणींविषयी सांगत राहू. काँग्रेसनं पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे मोठा पक्ष व्हायला हवं. त्यासाठी आपल्याला पुनर्रचना करणं आवश्यक आहे. प्रमुखाने ऐकणंच सोडून दिलं, तर संघटना कोसळेल. आम्हाला फक्त इतकंच हवं आहे की पक्षानं आमचं ऐकावं”, असं कपिल सिब्बल म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना त्यांनी जितिन प्रसाद यांच्यावर नाराजी व्यक्त केली. “जितिन प्रसाद यांनी जे केलं, त्याच्या विरुद्ध मी नाहीयेय. त्यांच्याकडे त्यासाठी वाजवी कारण देखील असू शकेल. पण भाजपामध्ये प्रवेश करणं हे मी समजू शकत नाही. आपण आयाराम गयाराम राजकारणापासून आता ‘प्रसादा’च्या राजकारणाकडे वळू लागल्याचं हे प्रतिक आहे. जिथे प्रसाद मिळेल, तो पक्ष तुम्ही जवळ करणार. माझं म्हणाल, तर काँग्रेस पक्षानं मला सांगितलं की आम्हाला तुमची गरज नाही, तर मी सोडून देईन. पण जिवंतपणी मी भाजपामध्ये जाणार नाही. माझ्या मरणानंतरच हे शक्य होऊ शकेल. माझ्या जन्मापासून मी भाजपाला विरोध करत आलो आहे. जितिन प्रसाद यांच्या कृतीवर माझा म्हणूनच आक्षेप आहे”, असं सिब्बल म्हणाले.