जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील एस-सेक्टरमधील प्रांजल इंडस्ट्रीज प्लॅस्टिक कंपनीतून ३६ हजार ५०० रुपये किमतीचे ईलक्ट्रीक मोटार व साहित्य चोरून नेल्याची घटना समोर आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय सिताराम प्रजापती (वय-३३ रा. रायपूर कुसुंबा ता.जि. जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी परिसरातील सेक्टर-एस मधील प्रांजल इंडस्ट्रीज प्लास्टिक दाना प्लांट कंपनीच्या मोकळ्या जागेतून संशयित आरोपी विजय प्रजापती याने १६ जून रोजी सकाळी १० वाजता १८ हजार रुपये किमतीची मोटार, प्लास्टीक कटर करणारे लहान व मोठे कटर असा एकुण ३६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीतील प्रमोद मराठे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी १८ जून रोजी दुपारी १२ वाजता धाव घेऊन विजय प्रजापती यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण करीत आहे.