धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कंडारी बुद्रुक येथे घरकुल योजना रद्द करण्याचे कारण विचारल्याचा रागातून एका तरुणाला गावातील सरपंचासह इतर सात जणांनी चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत रविवारी ४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील कंडारी बुद्रुक येथे शौकत कालू पाटील हा तरुण त्याची आई व परिवारासह वास्तव्याला आहे. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता कंडारी ग्रामपंचायत कार्यालयात शौकत पटेल हा सरपंच कौसरबी पटेल यांच्याकडे जाऊन माझं घरकुल योजना का रद्द केली, याचा जाब विचारला. याचा राग आल्याने सरपंच कौसरबी हिलाल पटेल, रफिक हिलाल पटेल, फारुख हिलाल पटेल, शकील येडू पटेल, वाहेद इमाम पटेल, राजूदादा मिया पटेल आणि बाबू सुभान पटेल सर्व राहणार कंडारी ता. धरणगाव यांनी शौकत पटेल याला अश्लील शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या संदर्भात रविवार ४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता शौकत पटेल याची आई बिबाबाई पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील करीत आहे.