नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशभरातील कंटेनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून अन्य ठिकाणी मात्र ८ जूनपासून टप्प्याटप्प्याने शिथीलता देण्यात येणार असल्याचे आज केंद्र सरकारच्या गाईडलाईनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
देशात लॉकडाऊन ५.० येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने आज जाहीर केलेल्या गाईडलाईनमध्ये याला जाहीर करण्यात आले आहे. देशभरात जिथेही कंटेनमेंट झोन आहे तिथे हा लॉकडाऊन सुरू राहणार आहे. तर अन्य ठिकाणी मात्र यात क्रमाक्रमाने शैथिल्य येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. गृह विभागाने जारी केलेली नवी नियमावली 1 जून ते 30 जूनपर्यंत लागू राहणार आहे. सध्याचा रात्रीचा कर्फ्यू सुरूच राहणार असून, अत्यावश्यक वस्तूंसाठी कोणताही कर्फ्यू असणार नाही. रात्रीच्या ९ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू राहील. ८ जूनपासून आणखी काही बाबी शिथिल करण्यात आल्या आहेत. ज्यानुसार धार्मिक स्थळे, मॉल्स, हॉटेल्स ८ जूनपासून उघडणार आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य असणार आहे तसंच मास्क घालणंही अनिवार्य असणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं, मेट्रो रेल्वे, सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, उद्याने इत्यादी सुरू करण्यासंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. दुसर्या टप्प्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परवानगीनंतर शाळा आणि महाविद्यालये उघडली जाणार आहेत. अर्थातच, शाळा उघडण्याचा निर्णय केंद्रानं राज्यांवर सोपवला आहे. राज्याबाहेरील किंवा राज्यांतर्गत वाहतूक खुली करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवासासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. पण तरीही राज्य सरकारच्या निर्णयाची आता सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.