पाचोरा, प्रतिनिधी । शबरी आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत ओझर ता. पाचोरा येथील ग्रामस्थांचे मंजूर यादीत नाव असुन सुध्दा गेल्या दिड वर्षांपासुन ग्रामस्थांना योजनेचा लाभ मिळत नसल्याने लाभार्थी ग्रामस्थांनी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर दि. १९ पासुन आमरण उपोषण सुरू केले होते. पंचायत समिती सभापती वसंतराव गायकवाड यांचे आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे.
तालुक्यातील ओझर मौजे येथील रहिवासी ज्ञानेश्वर हिरामण सोनवणे, सिध्दार्थ शांताराम गायकवाड, राजाराम संभाजी सोनवणे, गोपाल दाजीबा सोनवणे, म्हाळसाबाई अशोक सोनवणे यांचे शबरी आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर असून याबाबत जि. प. कार्यकारी अधिकारी यांचे दि. २३ जुलै २०१९ रोजीचे “ड” यादीत मध्ये नाव असुन सुध्दा आजपर्यंत या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही.
याप्रकरणी खासदार उन्मेश पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु कुठलीच कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी दि. १९ आॅक्टोबर रोजी पंचायत समिती पाचोरा समोर सरकारी सुचनांचे पालन करत चेहऱ्यावर मास्क, सोशल डिस्टंन्सिन चे पालन करत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आले होते. दि. २० रोजी पंचायत समिती सभापती वसंतराव गायकवाड यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे घरकुल मिळवुन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील, गोविंद शेलार उपस्थित होते.