मुंबई : वृत्तसंस्था । मुंबईच्या मोठ्या बांधकाम व्यावसायिकांपैकी एक असलेल्या ओमकार ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना ईडीने अटक केली आहे. या दोघांना शनिवारपर्यंत ईडीच्या कस्टडीत ठेवण्यात येणार आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने ओमकार बिल्डर ग्रुप समुहाचे अध्यक्ष कमल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना २२ हजार कोटी रुपयांच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प फसवणूक प्रकरणात अटक केली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी येस बँकेकडून ४५० कोटींच्या गुंतवणुकीसह अनेक बँकांकडून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप ओमकार ग्रुपवर आहे.
ओमकार ग्रुपने २२ हजार कोटी रुपयांच्या अनियमिततेचा आकडा नाकारला आहे. औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेत दाखल केलेल्या एफआयआरशी संबंधित ४१० कोटी रुपयांच्या एफआयआरशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी आणि बुधवारी इडीने ओमकार ग्रुपच्या १० जागांवर छापा टाकला होता.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतल्यानंतर संबंधित संस्थेची कार्यालये आणि गुप्ता-वर्मा यांच्या निवासस्थानांमधून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराशी निगडित अनेक कागदपत्रे सापडली आहेत. २७ जानेवारी रोजी दुपारी बाबूलाल वर्मा आणि कमल गुप्ता यांची ईडीमार्फत चौकशी केली गेली. दोघेही तपासात सहकार्य करत नव्हते, त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
२०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात ओमकार ग्रुप आणि गोल्डन एज ग्रुप ऑफ कंपनीजच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात आरोप करण्यात आला होता की, या दोन कंपन्यांनी झोपडपट्टीवासीयांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करुन मोठा घोटाळा केला आहे. खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात ओमकार ग्रुप आणि गोल्डन एज ग्रुप ऑफ कंपनीजविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.
ओमकार ग्रुपच्या अधिकाऱ्यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या विकासासाठी लेटर ऑफ इंटेन्ट मिळवण्यास मदत केल्याचा आरोपही याचिकेत केला आहे. या एलओआयचा उपयोग विविध बँकांकडून सुमारे २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही केला गेला आहे. मुंबईतील सर्वात मोठी रिअल इस्टेट संस्था ओमकार ग्रुप ही मुंबई उपनगरातील प्रिमियम रियल इस्टेट प्रोजेक्टमध्ये काम करते. ही संस्था वरळी येथील प्रतिष्ठित ओमकार १९७३ प्रोजेक्टसाठी ओळखले जाते. या इमारतीत अनेक बड्या व्यक्तिंनी फ्लॅट विकत घेतले आहेत. ओमकार ग्रुप ही एसआरए प्रकल्पातील सर्वात मोठी रियल इस्टेट कंपनी आहे.
ओमकार बिल्डरविरोधात तक्रार करणाऱ्या महेंद्र सुराना यांचे वकील यश आनंद सिंह यांचा दावा आहे की, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच हा एकूण २२ हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे.