ऑफिसमध्ये कामासोबतच शिष्टाचाराचे ज्ञान असणे गरजेचे – राधिका सुब्रमन्यम

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जेव्हा आपण व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून कॉर्पोरेट क्षेत्रात (नोकरीत) रुजू होतो तेव्हा नवीन कार्यालय आणि तिथे काम करणाऱ्या लोकांबद्दल आपण खूप उत्सुक असतो. आपण ऑफिसमधील वरिष्ठ, वातावरण आणि सुविधांबद्दल जाणून घेऊ इच्छितो. दरम्यान, ऑफिसमध्ये आपण कसे वागले पाहिजे हे आपण विसरून जातो. आपण आपले कपडे, शूज, केशरचना अगदी हँडबॅगकडे लक्ष देत नाही तसेच आपल्या वागण्याचा विचारही करत नाही. आपण आपल्या वर्तनाच्या बाजूकडे सर्वाधिक लक्ष दिले पाहिजे. तुमच्या वागण्याने कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सहकारी कर्मचारी आणि वरिष्ठांशी अशा प्रकारे वागावे की, प्रत्येकाला तुम्ही हवेहवेसे वाटायला हवेत, असे मत गोदरेज बॉयस लिमिटेडच्या हेड ऑफ चॅनल मॅनेजमेंट राधिका सुब्रमन्यम यांनी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या उपस्थित होत्या त्यांनी यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सर्व उपस्थितांचे स्वागत करत सांगितले की आजकालच्या तरुणांनी जॉब सिकर न होता जॉब क्रियेटर व्हायला हवं एखादं ध्येय साध्य करण्यासाठी, चांगली टक्केवारी मिळवण्यासाठी प्रत्येकजण अथक परिश्रम घेत असतो. हार्डवर्क करणारे एकाचवेळी खूप जण असू शकतात. त्यामुळे, ‘हार्ड’ काम अधिक ‘स्मार्ट’पणे कसं करता यालाही महत्त्व असल्याचे म्हणत रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाने आपल्या अभ्यासक्रमात इलेक्टीव विषय देत जर्मन, जपानी व फ्रेंच भाषेचे वर्ग सुरू केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यानंतर आपल्या मार्गदर्शनात राधिका सुब्रमन्यम यांनी पुढे नमूद केले कि, तुमची मैत्रीपूर्ण वागणूक किंवा ऑफिसमधील मोठे वर्तुळ तुम्हाला निष्काळजी बनवू शकते. बरेच लोक तुमच्या आजूबाजूला फिरत राहतात, जे तुमच्या कामापासून तुमचे लक्ष विचलित करतात. बर्‍याच वेळा, तुम्ही भावनेच्या भरात एखाद्याशी वैयक्तिक गोष्टी शेअर करता आणि दुसरा तुमच्या गोपनीयतेचा आदर करत नाही. तुमच्या गोष्टी सर्वांसमोर येतात आणि ऑफिसमध्ये तुमची इमेज खराब होऊ लागते. तसेच ऑफिसमध्ये मोबाइल सायलेंट मोडवर ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर त्याची रिंग व्हॉल्यूम कमी ठेवा. तुमच्या या सवयीमुळे तुमच्या सहकाऱ्यांना तुमच्यामुळे विनाकारण त्रास सहन करावा लागणार नाही. ऑफिसमधील डेस्क साफ करणे याचा देखील व्यावसायिक वर्तनात समाविष्ट होतो.

ऑफिसमध्ये व्यक्त होण्यासाठी संवाद, आत्मविश्वास आणि कल्पना या तिन्ही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. हे तीन गुण तुमच्यात असतील तर तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकता. तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन नेहमी वेगळे ठेवावे. घरातील समस्या घेऊन ऑफिसमध्ये बसलात तर त्याचा विपरीत परिणाम होतो. यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल. अनेकवेळा लोक ऑफिसमध्ये येऊन घराशी संबंधित कामे करताना दिसतात. यामुळे कार्यालयीन कामकाजही विस्कळीत होते. कार्यालयीन वेळेत दीर्घ कालावधीचे वैयक्तिक कॉल करणे टाळा. कामाच्या ठिकाणी तुमचे यशही वर्तनावर अवलंबून असते. प्रभावी वागणूक हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे, ऑफिसमध्ये तुम्ही सर्वांशी समानतेने आणि आदराने वागले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत आदराचे आणि विश्वासाचे नाते ठेवले तर त्यांनाही तुमच्याबद्दल अशीच भावना असेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी प्रा. तन्मय भले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. रोहित साळुंखे यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी कौतुक केले.

Protected Content