ऑनलाईन सट्टा खेळवणाऱ्या दोघांना अटक; अमळनेर पोलीसांची कारवाई

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहरातील झामी चौकात ऑनलाईन सट्टा व जुगार खेळणाऱ्या २ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ लाख ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, अमळनेर शहरातील राहणारा महेंद्र सुदाम महाजन हा अवैधरित्या बनावट जुगाराच्या वेबसाईट तयार करून अनेकांची फसवणूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना मिळाली होती. अमळनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पथकातील पोलिस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, पोहेकॉ किशोर पाटील, मपोहेकॉ रेखा माळी, सिद्धांत शिसोदे, रवींद्र पाटील, आशिष गायकवाड, अमोल पाटील, निलेश मोरे, अतुल मोरे, नम्रता जरे यांना पथकांना कारवाई करण्यासाठी सूचना दिल्या. त्यानुसार पथक १० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील झामी चौक परिसरातील पवन चौकात एका ठिकाणी छापा टाकला. यात संशयित आरोपी महेंद्र सुदाम महाजन रा. पाटील कॉलनी, अमळनेर व त्याचा साथीदार जयंत गणेश पाटील रा. बोरसे गल्ली, कृष्ण मंदिर, अमळनेर आणि फिरोज खान नसीम खान पठाण रा. आनंदपुरा सराफ बाजार यांच्यावर कारवाई केली. कसून चौकशी केली असता त्यांनी १७ ते १८ जण मिळून एका बनावट वेबसाईट तयार करून लोकांकडून पैसे घेत सट्टा आकडा लावून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी महेंद्र सुदाम महाजन यांच्याकडून बेहिशोबी ३ लाख ०७ हजार रुपयांची रोकड पैसे मोजण्याची मशीन, कागदपत्रे असा एकूण ३ लाख ८५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज न्यायालयात हजर केले असता दोघांना १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Protected Content