जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऑनलाईन मुलाखत द्या असे सांगून दिलेल्या लिंकवर क्लिक केल्याने तरूणाच्या बँक खात्यातून १७ हजार ६०० रूपये परस्पर काढून नेल्याचे उघडकीला आले. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोहन अशोक मोरे (वय-२४) रा. शिवाजी नगर, पाचोरा हा तरूण कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २ मे रोजी दुपारी त्याला अनोळखी नंबरवरून फोन आला. नोकरीसाठी ऑनलाईन मुलाखत द्या असे सांगितले. दरम्यान, समोरील नंबरवरून महिलेने एक लिंक पाठविली. व पेपर सोडविण्यास सांगितले. तरूण पेपर सोडवित असतांना त्याच्या बँक खात्यातून एकुण १७ हजार ६०० रूपये परस्पर वर्ग करून फसवणूक केल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निवृत्ती मोरे करीत आहे.