भोपाळ : वृत्तसंस्था । मध्य प्रदेशमध्ये कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढत असतानाच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. शहडोल येथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या सुरक्षेसंदर्भातील प्रश्न उपस्थित केले जात आहे. भोपाळमधील एका रुग्णालयातही अशीच घटना घडल्याचं वृत्त आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील पिपल्स हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे १० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यानंतर एकच गोंधळ उडाला आहे. रुग्णालय प्रशासनाने हे वृत्त फेटाळलं आहे. सकाळी रुग्णालयातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याला नक्कीच फटका बसला होता मात्र त्यामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही असा दावा रुग्णालय प्रशासनाने केलाय.
काही दिवसांपासून या रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भातील तक्रारी सातत्याने रुग्णालय प्रशासनाकडे करत होते. रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्यांना यासंदर्भातील माहिती कर्मचाऱ्यांकडूनच दिली जात आहे. रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा रात्रभर पुरेसा असला तरी सकाळी तो संपतो. अशाच प्रकारे सोमवारी सकाळी ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने १० रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने हे मृत्यू प्रकृती खालावल्याने झाल्याचे सांगितले ऑक्सिजनचा पुरवठा कमी जास्त प्रमाणात होत असतो अशी सारवासारवही रुग्णालयाने केली
दोन दिवसांपूर्वीच शहडोलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने कोरोनाच्या १२ रुग्णांना प्राण गमावावा लागला होता. ही घटना शहडोल मेडिकल कॉलेजमध्ये घडली. शहडोलचे जिल्हाधिकारी अर्पित वर्मा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. शनिवारी रात्री १२ वाजता रुग्णालयातील ऑक्सिजनचा दाब अचानक कमी झाला आणि रुग्णांना ऑक्सिजन कमी प्रमाणात पुरवला जाऊ लागला. रुग्णांची तडफड पाहून नातेवाईकांना मास्क दाबून योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळेल यासाठी धावपळ केली मात्र त्यांना यामध्ये यश आलं नाही. सकाळी सहा वाजेपर्यंत अशाच परिस्थितीत नातेवाईकांनी रात्र काढली. मात्र सहाच्या आसपास १२ रुग्णांचा ऑक्सिजन आभावी मृत्यू झाला. आतापर्यंत मध्य प्रदेशमधील भोपाळ, सागर, जबलपुर आणि उज्जैनमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रकार समोर आलेत.