जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार व परिवहन मंत्री यांच्या आवाहनानुसार ८ ते १५ एप्रिल दरम्यान जळगाव विभागात सुमारे ४१९३ कर्मचाऱ्यांपैकी ३५०० च्यावर कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच मार्गावर एसटी बऱ्यापैकी धावू लागली असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात १५ एप्रिल दरम्यान १३७ चालक, १६० वाहक, ४ वाहक कम चालक, ८४ कार्यशाळा कर्मचारी आणि ६ प्रशासकीय कर्मचारी असे एकूण ३९१ कर्मचारी जळगाव विभागात कामावर हजर झाले होते. विभागात ४१९३ एसटी कर्मचारी कार्यरत असून सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात जवळपास ७५ टक्के एसटीचे कर्मचारी कामावर परतले आहेत. यात १०५९ चालक, १०९४ वाहक, ९४ चालक कम वाहक, ७८५ यांत्रिक, ४८२ प्रशासकीय असे एकूण ३५१४ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यामुळे जळगाव आगरासह अन्य ११ आगारात देखील विविध मार्गावर प्रवासी बस फेऱ्यात वाढ झाली असल्याचे जळगाव विभाग प्रमुख भगवान जगनोर यांनी म्हटले आहे.