जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एसएमआयटी कॉलेज रस्त्यावरील नेहरू नगरलगतच्या नाल्याचे बांधकाम अपूर्ण असल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे वृत्त माध्यमातून प्रसिद्ध झाल्याने सोमवारी महापौर भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी केली. अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून संबंधित कामाची खाजगी व मनपा अभियंत्याकडून पाहणी करून दंड आकारणी करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.
एसएमआयटी कॉलेज रस्त्यावरील नाल्याचे काम करण्यासाठी जुन्या गटारीवरील ढापा मक्तेदाराने काढल्याने नेहरू नगर, प्रेम नगर परिसरातील नागरिकांना फिरून जावे लागत आहे. माध्यमातून याबाबत वृत्त प्रकाशित होताच महापौर सौ.भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, प्रतिभा देशमुख, उपायुक्त पवन पाटील, अभियंता प्रकाश पाटील, श्री.सोनगिरे व इतर अधिकारी उपस्थित होते.
महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मक्तेदाराला खडसावत कामाला उशीर का झाला याबाबत विचारणा केली तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. काम किती प्रमाणात झाले, कामाची मुदत लक्षात घेता नियमानुसार दंड आकारण्याचेही महापौरांनी सांगितले. लॉकडाऊन असल्याने मजूर नसल्याचे मक्तेदाराने सांगितले त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे महापौरांनी मनपा अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, संबंधित नाल्याची सफाई अपूर्ण असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली असता उद्याच नालेसफाई पूर्ण करण्याच्या सूचना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिल्या.