एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील धरणगाव रोडवर असलेल्या एरंडोल तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शार्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत कार्यालयातील साहित्य जळून खाक झाले असून सुमारे २ लाख ८८ हजार ६५० रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. या संदर्भात एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती याप्रमाणे, एरंडोल शहरातील धरणगाव रोडवर असलेल्या ओमशांती नगरात एरंडोल तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहे. १२ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कार्यालयात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत सिलिंग फॅन, लाकडी टेबल, कपाट ,प्लास्टिक खुर्च्या, प्रिंटर, कॉम्प्युटर, ट्यूबलाईट, कुलर यासह आधी सामान असा एकूण २ लाख ८८ हजार ६५० रुपये किमतीचे सामान जळून नुकसान झाले आहे. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर एरंडोल येथील नगरपालिकेचे अग्निशमन बंबने ही आग विझवण्यात आली. या संदर्भात सायंकाळी ७ वाजता कृषी सहाय्यक अधिकारी चंद्रकांत गोकुळ सैंदाणे (वय-३८) रा. एरंडोल यांनी दिलेल्या खबरीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनील लोहार करीत आहे.