एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल उपविभागात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ६८ टक्के असल्याची माहिती प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे. कोविड केअर सेंटरमधील चांगल्या सुविधांमुळे हे शक्य झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
या संदर्भात प्रांताधिकारी विनय गोसावी म्हणाले की, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर एरंडोल उपविभागात तिसर्या लॉकडाऊनपर्यंत एकही रुग्ण नव्हता. तथापि, परराज्यातून, परजिल्ह्यातून नागरिक येण्यास सुरूवात झाल्यानंतर कोरोना रुग्ण येथे आढळला.
उपविभागातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकिय अधिकारी, आरोग्य व पोलिस यंत्रणा यांच्या सहकार्याने पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांचे ट्रेसिंग वाढविण्यात आले. यामुळे संशयितांची लागलीच तपासणी व उपचार करता आले. कोविड केअर सेंटरमध्येही डॉक्टर, इतर स्टाफने चांगल्या सुविधा दिल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. एरंडोल विभागातील एरंडोल, पारोळा, धरणगाव या तालुक्यातील कोविड रुग्णालयात सध्या ५३३ पैकी १४१ रुग्ण आता दाखल आहेत. एकूण पॉझिटीव्ह रूग्णांपैकी ७०% पॉझिटीव्ह कॉन्टॅक्ट टेसिंग मध्ये आढळले म्हणून रुग्ण संख्या वाढली, पण कॉन्टॅक्ट ट्रेसिंंगमध्ये रुग्ण वाढल्याने योग्यवेळी हे रुग्ण समाजापासून विलगीकरण झाले. तर प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील केवळ १० टक्के रूग्ण आढळले आहे.
प्रांताधिकारी पुढे म्हणाले की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि उपविभागातील नागरिकांनी तसेच इतर सर्व लोकप्रतिनिधी यांनी केलेले सहकार्य यामुळे एरंडोल उपविभागातील रूग्ण बरे होण्याचा दर ६८ टक्क्यांपर्यत पोहोचला असून याबाबत नागरिकांमध्येही समाधान असल्याचेही विनय गोसावी म्हणाले.