कासोदा ता.एरंडोल, प्रतिनिधी । तालुक्यातील अनेक नागरिकांना शिधापत्रिका नाही, त्यामुळे शासनाकडून मिळणारा धान्यापासून ते वंचित राहतील. त्यांना नवीन शिधापत्रिका मिळावी म्हणून आर.पी.आय. आठवले गटाकडून नायब तहसीलदार श्रीमाळी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, देशात व राज्यात थैमान घालणारा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने संपूर्ण राज्यात संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. २१ दिवसाच्या लॉक डाऊन कालावधीमुळे जनतेला अत्यंत अडचणी समोर जावे लागणार असून ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. गोरगरीब जनतेला शासकीय धान्य मिळण्याकरिता शिधापत्रिका आवश्यक आहे. परंतु, अनेक नागरिकांकडे शिधापत्रिका नाही त्यामुळे गोरगरीब जनता शासकीय धान्यापासून वंचित राहतील तरी त्यांना त्वरित नवीन रेशन कार्ड मिळावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदन सादर करतांना एरंडोल तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर, सचिव देवानंद बेहरे, तालुका उपाध्यक्ष सिताराम मराठे उपस्थित होते.