जळगाव प्रतिनिधी । अवैध दारु, सट्टा, वाळु वाहतूक करणाऱ्यांच्या संपर्कात राहणे आणि आक्षेपार्ह बोलणे या कारणांमुळे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे मनोज सुरवाडे, किशोर पाटील व विजय पाटील या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी पोलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. अवैध दारु, सट्टा, वाळु वाहतूक करणाऱ्यांच्या संपर्कात राहुन काही पोलिस कर्मचारी ‘हप्ते’ गोळा करीत असल्याच्या अनेक तक्रारी वरीष्ट अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलिस अधिक्षक डॉ.उगले यांनी स्वतंत्र पथकामार्फत या प्रकरणांची चौकशी सुरू केली होती.
पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना या चौकशीची माहिती यापुर्वी नव्हती. पडद्यामागे राहुन या पथकाने चौकशी करुन तसा अहवाल डॉ. उगले यांच्याकडे सादर केला होता. या अहवालानुसार विजय पाटील, किशोर पाटील व मनोज सुरवाडे या तीन कर्मचाऱ्यांवर दोषी धरून कर्तव्यात कसुर करुन अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या संपर्कात हे तीघे पोलीस कर्मचारी असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारपासून या तीन्ही कर्मचाऱ्यांची पोलिस मुख्यालयात बदली होणार आहे. ही बदली किती दिवसांसाठी असेल या बाबत अद्याप स्पष्ट आदेश दिलेले नाहीत. अशी माहिती पोलिस अधिक्षक डॉ.उगले यांनी दिली.