जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संरक्षक भिंतीच्या खाली खड्डा खोदून चोरट्यांनी एमआयडीसीतील एच.डी.प्रोटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये प्रवेश करून दीड लाख रूपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, एच.डी.प्रोटेक्ट कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून मोहन बलवत कुलकर्णी हे कामाला आहेत. बुधवारी ३ मे रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास कंपनीत फेरफटका मारत असताना त्यांना फाँड्री विभागातील व्यवस्थापक ए.कुमारेशन यांनी सांगितले की, १ लाख ३२ हजार ३०० रूपये किंमतीचे मिडल एल्बो कास्टींग आणि १३ हजार रूपये किंमतीचे एनगॉट ब्राँझ धातूच्या दोन पट्टया गायब झाल्या आहेत. त्यानंतर कुलकर्णी यांच्यासह इतर सहका-यांनी कंपनी व कंपनीच्या आवारामध्ये गायब झालेल्या साहित्यांचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाही. त्यावेळी त्यांना कंपनीच्या पूर्व बाजूच्या संरक्षक भिंतीच्या खाली खड्डा खोदलेला दिसला. त्यामुळे कुलकर्णी यांना खात्री झाली की, संरक्षक भिंतीच्या खाली खड्डा खोदून चोरट्यांनी कंपनीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर साहित्य चोरी केले. अखेर गुरूवारी ४ मे रोजी दुपारी कुलकर्णी यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.