नवी दिल्ली वृत्तसंस्था । एप्रिल महिन्यात पूर्व लडाख सीमेवर चिनी सैनिकांची संख्या आणि त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या संख्येमध्ये वाढ दिसून आली. मे महिन्याच्या सुरुवातीपासून चीनने गलवान खोऱ्याच्या भागात आपल्या सैनिकांच्या गस्तीमध्ये अडथळे आणायला सुरुवात केली. ज्यामुळे समोरा-समोरच्या संघर्षाची स्थिती निर्माण झाली” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
“चीनची ही कृती म्हणजे एकतर्फी जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न होता. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला हे मान्य नाही हे चीनला मुत्सद्दी तसेच लष्करी पातळीवरुन कळवण्यात आले” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
“एलएसीवरील वाढता संघर्ष लक्षात घेऊन दोन्ही बाजूच्या सैन्य कमांडर्समध्ये सहा जून २०२० रोजी बैठक झाली. त्यामध्ये तणाव कमी करण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय झाला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा मान्य करुन, जैसे थे परिस्थिती बदलेल असे काही करायचे नाही, यावर दोन्ही बाजू सहमत झाल्या” असे राजनाथ सिंह संसदेत म्हणाले.
“अशी सहमती होऊनही चीनकडून १५ जूनला गलवान खोऱ्यात हिंसक संघर्षाची स्थिती निर्माण केली गेली. आपल्या शूर जवानांनी प्राणांचे बलिदान दिले व चीनचेही मोठे नुकसान केले व भारताची सीमा सुरक्षित ठेवली” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.