मुंबई प्रतिनिधी– अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला सात वर्षे झाल्याच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ‘सध्या महाराष्ट्रात असलेल्या सरकारमधील एका मोठ्या व्यक्तीनंच दाभोलकर प्रकरण दाबलं आहे,’ असा संशय आंबेडकरांनी व्यक्त केला आहे. आंबेडकरांचा नेमका रोख कुणाकडे आहे, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नेमकी कालच दाभोलकरांची आठवण काढत सीबीआयवर निशाणा साधला होता. सुशांत प्रकरणाच्या तपासाची गत दाभोलकरांच्या चौकशीसारखी होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी दाभोलकर प्रकरणावर एका मागोमाग एक ट्वीट केले आहेत.
आंबेडकरांनी राज्यात सध्या असलेल्या सरकारमधील एका व्यक्तीवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘आज नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला ७ वर्ष पूर्ण होताहेत. आरोपींचा आणि त्या कटाच्या मास्टरमाईंडचा अजूनही शोध लागलेला नाही, तो लागणारही नाही. राज्यात सेक्युलर सरकार आलंय असं म्हणतात. पण, आम्हाला शंका आहे की, या सेक्युलर सरकारमधीलच एका मोठ्या व्यक्तीनं हे प्रकरण त्याचवेळी दाबले होते.
दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी समस्त पुरोगामी मंडळींना आवाहन केलं आहे. ‘ही लढाई न्यायालयीन नसून राजकीय आहे, तेव्हा त्यापासून तुम्हाला पळता येणार नाही. इथल्या संत परंपरेविरुद्ध वैदिक परंपरेचे हे राजकीय युद्ध आहे. या युध्दातले खरे मित्र आणि खरे शत्रू ओळखून निराश न होता, न घाबरता हे आंदोलन चालू ठेवण्याची गरज आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.