ऊसतोड कामगारांना ५०० रुपये प्रति टन मजुरी द्या,, अन्यथा आंदोलन (व्हिडीओ)

चाळीसगाव, प्रतिनिधी । आम्हाला पाचशे रुपये प्रति टन ऊस तोडणी मजुरी मिळावी अन्यथा आम्ही ऊस तोडण्यासाठी कारखान्यावर जाणार नाही असा पवित्रा ऊसतोड कामगारांनी विभागीय प्रमुख किशोर पाटील ढोमणेकर यांच्या नेतृत्वाखाली घेतला असून याबाबत ४ ऑक्टोंबर रोजी पत्रकार परिषदेद्वारे किशोर पाटील व मजुरांनी हे जाहीर केले आहे.

ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये गेल्या ७ वर्षापासून एक रुपया देखील वाढ झालेली नसून केवळ २४९ रुपये प्रति टन मजुरी वर कामगार ऊसतोड करीत आहेत. मात्र त्यामानाने महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे याचा विचार करून शासनाने आता ऊसतोड मजुरांना आपली मजुरी वाढवून देऊन पाचशे रुपये प्रति टन करावी अशी मागणी मजुरांची आहे. ऊस तोडणीसाठी खान्देशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जवळपास ४ लाखांपेक्षा जास्त मजूर आहेत. त्यांचा उदरनिर्वाह या कामावरच चालतो. मात्र सध्या परिस्थितीमध्ये ज्वारी, बाजरी कापणी, कपाशी वेचणी करणाऱ्या मजुरांना २०० रुपयांपेक्षा जास्त रोजंदारी मिळत असून आम्हाला मात्र फक्त २३९ रुपये प्रति टन इतकी किरकोळ मजुरी मिळत असल्याने आम्ही आता गावातच शेतमजुरी करण्याचे काम पत्करू आणि ऊस तोडणीसाठी जाणार नाहीत असाही सूर या कामगारांचा आहे. खानदेश व मराठवाडा भागातील मजुरांचे नेतृत्व किशोर पाटील ढोमणेकर हे करीत असून त्यांच्या गाव परिसरात आजमितीस जवळपास दोन ते तीन हजार मजूर ठिय्या मांडून बसलेले आहेत. कामगारांच्या मागण्या शासनाने मान्य न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे. यावेळी आबा पाटील लोणजेकर, प्रकाश पाटील, मुकुंदा पाटील, नवल चव्हाण, हरिभाऊ दाभाडे, विश्वजीत पाटील, नारायण दाभाडे व इतर ऊसतोड मुकादम मजूर उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3711423228903001/

Protected Content