जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उसनवारीने घेतले पैसे देण्याच्या कारणावरून एकाला शिवीगाळ केल्याची घटना जळगाव तालुक्यातील नांद्रा बु. येथे घडली होती. याप्रकरणी शनिवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता तीन जणांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातीला नांद्रा बु. येथे गणेश रघूनाथ सोनवणे हे वास्तव्यास असून २७ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गावातील प्रशांत अविनाश सोनवणे, भुषण सुरेश वाघ व राजेंद्र देवराम सोनवणे हे गणेश सोनवणे यांच्या घराजवळ आले. यावेळी भूषण वाघ हा गणेश सोनवणेंना म्हणाला की, तु प्रशांत सोनवणे याचे उसनवार घेतलेले पैसे का देत नाही. या कारणावरुन त्यांनी गणेश सोनवणे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच यांचा माज उतरवून घेवू कितीही पैसे लागले तरी हरकत नाही असे देखील म्हटले.
शिवीगाळ केल्यानंतर प्रशांत सोनवणे व राजेंद्र सोनवणे यांनी गणेश सोनवणे यांना तु पैसे दिले नाही, तर तुला चौकात सर्वांसमोर मारु अशी धमकी दिली. याप्रकरणी गणेश सोनवणे यांनी लागलीच तालुका पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित भूषण सुरेश वाघ, राजेंद्र देवराम सोनवणे व प्रशांत अविनाश सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संदीप गावित हे करीत आहे.