मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उष्माघाताने झालेल्या मृत्यूला नैसर्गिक आपत्ती मानून त्याच निकषानुसार मदत मिळावी अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आमदार एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे की, सध्या उष्णतेची मोठी लाट सुरू असून यामुळे अनेकांचे मृत्यू होत आहेत. आमच्या जळगाव जिल्ह्यात देखील उष्माघाताने अनेकांचे मृत्यू झालेले आहेत. उष्माघातापासून बचाव व्हावा यासाठी राज्य शासन जनजागृती करत असली तरी शेतकरी, शेतमजूर, बांधकाम कामगार आदींना उन्हात काम करावेच लागत असून यामुळे त्यांचे मृत्यू होत आहे.
सद्यस्थितीत उष्माघाताने मृत्यू झाल्यास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही. यामुळे उष्माघाताने झालेल्या मृत्यूला नैसर्गिक आपत्ती मानून यासाठी मयताच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मागणी मिळावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या वतीने तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी देखील या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.