जळगाव प्रतिनिधी । औरंगाबाद येथून खासगी कारने उमाळा येथे आलेल्या चार तरुणांनी कारचालाकाच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून मारहाण करीत त्याच्याकडील मोबाईल व रोखरक्कम लुटल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, औरंगाबाद येथील पैठनरोड ईटखेडा येथील भागवत रामभाऊ मूळे (४५) यांची (एमएच २० ईजी ६०६५) क्रमांकाची पांढर्या क्रमांकाची कार असून ते ती भाडेतत्वावर चालवून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. ९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील सिडको बस स्टँडवर २० ते २५ वर्षीय चार तरुण त्यांच्याकडे आले. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील उमाळा येथे जाण्याबाबत विचारले. यावेळी भागवत मूळे यांनी त्यांना ३ हजार ५०० रुपये भाडे सांगितल्यानंतर ते चारही तरुणांनी भाडे देण्यासाठी होकार सांगितल्याने भागवत मूळे हे उमाळा जाण्यासाठी निघाले.
चारही तरुणांचे फोटो पाठविले पत्नीच्या व्हाट्सऍपवर
चारही तरुणांनी गाडी ठरविल्यानंतर ते रात्री ९ वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथून उमाळा जाण्यासाठी निघण्याआधी भागवत मूळे यांनी त्या चारही तरुणांचे फोटो काढून त्यांच्या पत्नीच्या व्हाट्सऍपवर पाठविले होते. त्यानंर ते प्रवासी घेवून उमाळा जाण्यासाठी निघाले.
उर्वरीत पैसे घरी देण्याची दिली हमी
उमाळा जाण्यासाठी निघालेल्या त्या तरुणांना भागवत मूळे यांनी पैशांची मागणी केली असता. त्या तरुणांपैकी एकाने फोन पे द्वारे ५०० रुपये त्यांच्या अकाऊंटला ट्रान्सफर केले. तर १ हजार रुपये त्यांनी भागवत मूळे यांना रोख स्वरुपात देत उर्वरीत पैसे उमाळा येथे घरी गेल्यावर देवू असे त्यांनी सांगितले.
चाबी न दिल्याने डोळ्यात फेकली मिरचीची पुड
रात्री १२.३० वाजेेच्या सुमारास उमाळा फाट्याजवळ पोहचल्यानंतर ते चारही जण गाडीतून खाली उतरले. यावेळी भागवत मूळे यांनी त्यांना उर्वरीत भाड्याची रक्कम मागितली असता. त्यापैकी एकाने त्यांच्याकडे त्यांच्या कारची चाबी मागितली, परंतु श्री. मूळे यांनी चाबी देण्यास नकार दिलयाने त्यांच्यापैकी एकाने आपल्या बॅगमधून मिरचीची पूड काढून ती भागवत मूळेंच्या डोळ्यात फेकली.
मारहाण करीत ड्रायव्हरला लुटले
भागवत मूळे यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून देखील ते गाडीची चाबी देत नसल्याने त्या तरणांकडून त्यांना मारहाण करण्यात येत होती. त्यातील काही तरुणांनी मारहाण करीत त्यांच्या खिशातील ५ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम व १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून घेतला.
आरडाओरड केल्याने भागवत मूळे यांनी मारहाण होत असतांना आरडाओरड केल्यामूळे गावातील काही लोक त्याठिकाणी आले. तोपर्यंत ते चारही तरुण त्याठिकाणाहून सिल्लोड रस्त्याकडे पळून गेले होते. भागवत मूळे यांनी अशाच परस्थितीत गाडी चालवित ते औरंगाबाद दाखल झाले. त्यांच्या फिर्यादीवरुन आज एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमाळा येथून दोन जणांना अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरविली. त्यांना मारहाण करुन लुटणार दोन तरुण उमाळा येथीलच असल्याच कळले. त्यांनी तात्काळ सपोनि अमोल मोरे, रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील यांचे पथक तयार करुन त्या दोघ संशयीतांना अटक केली आहे. पुढील तपास रामकृष्ण पाटील, सचिन पाटील व योगेश बारी हे करीत आहे.