उन्नत शेती समृध्द शेतकरी योजनेतंर्गत पालकमंत्र्यांचे हस्ते शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे वाटप

gulabrao patil 1

 

जळगाव (प्रतिनिधी) उन्नत शेती समृध्द शेतकरी योजना कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमांतर्गत कृषि विभागामार्फत आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव व धरणगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व औजारे वाटप करण्यात आले.

 

सदरचे औजारे वाटपाचा कार्यक्रम नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळेस प्रामुख्याने लहान व मोठे ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र, कापुस पऱ्हाटी श्रेडर इ. 28 औजारांचे वाटप करण्यात आले. शेतक-यांना स्वत:च्या मालकी हक्काची कृषि यंत्रसामुग्री/औजारे खरेदीस प्रोत्साहीत करणे तसेच कृषि औजारांच्या सेवा सुविधा शेतक-याना प्रचलीत भाडेदरापेक्षा कमी दराने उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने औजारे बँक स्थापन करणे व त्याव्दारे कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे हा प्रमुख उद्देश असणारी कृषि यांत्रिकीकरण योजना जळगाव जिल्हयात 2014-15 पासुन राबविण्यात येते. सदरची योजना कृषि यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण प्रकल्प, राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या चार योजनांच्या माध्यमातुन राबविण्यात येते. या सर्व योजनांमधुन जळगाव जिल्ह्यास 657.80 लाखाचा कार्यक्रम मंजुर असुन योजनेचा लाभ घेण्यासाठी 8 हजार 661 अर्ज प्राप्त झाले आहे. आज अखेर या योजनेतंर्गत एकुण 5 पॉवर टिलर, 127 ट्रॅक्टर, 430 औजारे, 146 पंपसंच, 2960 पाईप वाटप करण्यात आले आहे.

औजारे वाटपाचे कार्यक्रमाप्रसंगी यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, मा श्री संभाजी ठाकुर, कृषि उपसंचालक, श्री अनिल भोकरे, कृषि विकास अधिकारी श्री मधुकर चौधरी, तालुका कृषि अधिकारी, जळगाव श्री सचिन बऱ्हाटे व तालुका कृषि अधिकारी, धरणगाव श्री अभिनव माळी व कृषि विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्यांचे गरजेनुसार योजनेंतर्गत उपलब्ध औजारांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच गटांच्या माध्यमातुनही कृषि औजारे बँक स्थापन करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घ्यावा, ज्यामुळे जिल्हयातील सर्व गावे यंत्रसामुग्रीत स्वयंपूर्ण होतील असे सांगितले.

Protected Content