जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यामधील माथाडी कामगारांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी उत्तर महाराष्ट्र माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्यादीत, जळगांव या संस्थेला सहकार विभागाकडून मान्यता मिळाली असुन त्याबाबतचे नोंदणी प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांच्या हस्ते संस्थेचे मुख्य प्रवर्तक ऍड. जमील देशपांडे यांना देण्यात आले. यावेळी प्रवर्तक सुनिल महारू माळी, सुकलाल माळी उपस्थित होते.
यांना होता येईल सभासद
जळगाव जिल्हा माथाडी मंडळाकडे जे कामगार, हमाल बांधव नोंदणीकृत आहेत त्यांनाच संस्थेचे शेअर घेता येईल व सभासद होता येईल.
संस्थेचे उद्देश
सभासदांना काटकसर, स्वावलंबन व सहकाराचा प्रसार करण्यास प्रोत्साहन देणे, भाग भांडवल स्थिकारणे, सभासदांकडून ठेवी स्विकारणे, बाहेरील कर्ज काढणे किंवा निधी उभारणे सभासदांना जामीन व कर्ज देणे व वसुली करणे, संस्थेच्या उपयोगासाठी मालकी हक्काने किंवा भाड्याने जागा किंवा इमारत खरेदी करणे, सभासदांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी विविध उपक्रम हाती घेणे व सभासदांना आत्मनिर्भर करणे.
याबाबत संस्था कार्य करेल
संस्थेचे निधी पुढील मार्गाने उभारले जातील – १) भाग विक्री, २) प्रवेश फी, ३)सभासदांकडून ठेवी, ४) कर्जे, ५) वर्गणी, ६) देणग्या व बक्षिसे, ७) आर्थिक सहाय्य.दि. ०५ ऑगस्ट पासुन सभासद नोंदणी प्रारंभ – रू. १००/- प्रवेश फी + रू. ५००/-
वर्गणी + रू. ५००/- शेअर असे एकुण रू. ११००/- देवुन माथाडी मध्ये नोंद असलेल्या कामगारांनाच सभासद होता येईल.
संस्थेचे कार्यक्षेत्र
उत्तर महाराष्ट्र माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेचे कार्यक्षेत्र हे जळगाव जिल्हा असे राहील. माथाडी कामगारांच्या पतसंस्थेला मान्यता मिळाल्यामुळे जिल्ह्यात माथाडी मंडळाकडे नांव नोंदण्यास मोठी चालना मिळेल.
संस्थेचे कार्यकारी मंडळ
मुख्य प्रवर्तक – अॅड. जमील देशपांडे, प्रवर्तक – सुनिल महारू माळी, संजय प्रभाकर चांदेलकर, सुनिल सुकलाल माळी, गोपाळ बाबुराव महाजन, रामकृष्ण हरी जावळे, भगवान रघुनाथ वाणी, रणजीत गोकुळ पाटील, दिनेश धनराज पाटील, सचिन भागवत माळी, ज्ञानेश्वर प्रकाश धनगर आदी आहेत. तर संस्था नोंदणी करणे बाबत जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, माथाडी मंडळाचे अध्यक्ष तथा कामगार उपायुक्त – चंद्रकांत बिरार, माथाडी निरीक्षक – चंद्रकांत पाटील, सहकार अधिकारी – एम. पी. देवरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कार्यकारी संचालक – जितेंद्र देशमुख, सहाय्यक निबंधक – व्हि.ए. गवळी सहाय्यक निबंधक मंगेशकुमार शहा, मुख्य लिपीक – मनोज खवळे, वरीष्ठ लिपीक – भगवान सुरवाडे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष पाटील, माथाडी कामगार संघटनेचे मतीन पटेल, संदीप मांडोळे, संदीप पाटील, चेतन आढळकर, अविनाश पाटील यांचे सहकार्य लाभले.
सहकार कायद्याच्या आदर्श उपविधी अंतर्गत अतिशय सचोटीने व प्रामाणिकपणे पतसंस्था संचलित करून माथाडी कामगारांमध्ये विश्वास निर्माण करू अशी ग्वाही मुख्य प्रवर्तक अॅड.जमील देशपांडे यांनी दिली आहे. मुख्य प्रवर्तक अॅड.जमील देशपांडे यांच्या गणपती नगर येथील कार्यालयात सभासद नोंदणी होणार असुन कामगारांच्या आस्थापनानी माथाडी कामगारांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.