पुणे : वृत्तसंस्था । पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात सतत होणाऱ्या दरवाढीच्या निषेधार्थ आज पुण्यात महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अलका चौकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला चपलांचा हार घालून निषेध केला.
यावेळी त्यांनी मोदींच्या फोटोची आरतीही केली. आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढच्यावेळी आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला.
“केंद्र सरकारमार्फत मागील महिन्याभरात गॅसच्या दारात सव्वाशे रुपये वाढ झाली आहे. तर दररोज पेट्रोल डिझेलमध्ये वाढ करून हा दर देखील १०० रुपयांपार गेलाय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जगणं कठीण झालं आहे. त्यामुळे आम्ही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोस चपलांचा हार आणि आरती करून निषेध व्यक्त केला”, अशी माहिती यावेळी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांनी दिली. तसेच, या आंदोलनाची दखल सरकारने घ्यावी अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.