नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीत सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बाटला हाऊस एनकाउंटर खटल्यात प्रकरणी दिल्ली न्यायालयाने आज इडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिझ खान याला फाशीची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने शिक्षेचा सुनावणीचा निर्णय राखून ठेवला होता. पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांच्या हत्येप्रकरणी आरिझ खानला फाशीची शिक्षा सुनावली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली होती.
मागील सुनावणीत न्यायालयाने आरिझ खानला दोषी ठरवलं होतं. दिल्ली पोलिसांनी त्याला २०१८ मध्ये अटक केली होती. न्यायालयाने आरिझ खानला आर्म्स अॅक्ट आणि कलम ३०२, ३०७ अंतर्गत दोषी ठरवलं होतं. २००८ मध्ये घडलेल्या बाटला हाऊस एनकाउंटर प्रकरणानंतर आरिझ फरार झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली होती.
आरिझ खानला बाटला हाऊस एनकाउंटरमध्ये जीव गमवावा लागलेल्या पोलीस निरीक्षक मोहन शर्माच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं आहे. तसेच, पोलीस कर्मचारी बलवंत सिंह-राजवीर यांना देखील त्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.