जळगाव प्रतिनिधी । दुर्गा देवी मंडळाच्या अध्यक्षपदावरुन आसोदा येथील तरूणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री आसोदा येथे घडली. याप्रकरणी जि.प.सदस्य पती रविंद्र देशमुखसह इतर दोघांवर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, गावातील पाटील वाड्यात धवल हा उभा होता. यावेळी विद्यमान जि.प.सदस्य पती जितेंद्र उर्फ रविंद्र बाबुराव देशमुख, शिवाजी धनराज पाटील व यश शिवाजी पाटील सर्व रा. आसोदा आले. त्यातील रवी देशमुख यांनी धवल यास तु जय भवानी दुर्गा उत्सव मित्र मंडळाचे अध्यक्षपद सोडून दे असे सांगितले. त्यावर धवल याने देशमुख यांस आमचे मित्र मंडळाचे अंतर्गत कारभारात पडू नको असे म्हणाला. त्याचा राग आल्याने देशमुख याने धवलच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. यावेळी देशमुख सोबतच्या शिवाजी पाटील व यश पाटील यांनी धवलला पकडून ठेवत, पोटावर तसेच पाठीवर बुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. विकास पाटील, सागर पाटील यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता देशमुख यांनी त्यांनाही चापटा बुक्क्यांनी तर देशमुख याने दोघांना कमरेच्या पट्टयाने मारहाण केली. याबाबत धवल पाटील याच्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात मारहाणीचा तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मास्क लावण्याचे आदेश असतांना मास्क न लावल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.