मुंबई प्रतिनिधी । किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप सिध्द करावेत, अन्यथा त्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार असल्याचा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या करत असलेल्या आरोपांमुळे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यासाठी तयारी शिवसेनेने केली आहे. सोमय्या यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होणार नाही तोपर्यंत ते शांत बसणार नाही असं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना वाटतं, त्यासाठी किरीट सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची चाचपणी शिवसेनेकडून केली जात आहे असं एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. याबाबत एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत यांनीही किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, ही मंडळी बेफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते आणि माझ्या कुटुंबासोबत तेच केले. हिंमत असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा, आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारले नाही तर माझं नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितलं असा इशारा त्यांनी दिला.