भुसावळ प्रतिनिधी । आयुध निर्माणींमधील २७५ उत्पादने नॉन कोअरमध्ये टाकून ती खासगी कंपन्यांना देण्याच्या केंद्र शासनाच्या धोरणास विरोध करण्यासाठी आयुध निर्माणीत संप करण्यात येत आहे.
येथील आयुध निर्माणीतील कर्मचार्यांनी २३ जानेवारीपासून तीन दिवसीय संप पुकारला आहे. यात कर्मचार्यांनी मोठ्या संख्येत भाग घेतला असून देशभरातील ४१ आयुध निर्माणीतील ९०० कोटी रुपयांचे संरक्षण साहित्याचे उत्पादन ठप्प झाले असल्याचे अखिल भारतीय संरक्षण महासंघ, इंटक आणि भारतीय प्रतिरक्षा मजदूर महासंघ फेडरेशनतर्फे सांगण्यात आले आहे. यात ४ लाख कर्मचारी सहभागी झाले. या आंदोलनामुळे संरक्षण विभागाच्या उत्पादनांची जबाबदारी असलेल्या आयुध निर्माणींमध्ये तीन दिवसांचे उत्पादन थांबले आहे.
तीन दिवसांचा संप हा केवळ केंद्र सरकारला प्रारंभिक इशारा असून भविष्यात अनिश्चित काळासाठी संप करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.