जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । येथील एम.जे. कॉलेज मागील आयडियल कॉलनीत भरदिवसा चोरटयांनी घरफोडी करून लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी १४ एप्रिल रोजी घडली आहे. दरम्यान, घरमालकाने रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ललित वसंत खडके (वय ४७) असे घरमालकाचे नाव आहे. ते आयडियल कॉलनीत सानिका कॉर्नरच्या शेजारी तुलसी अपार्टमेंटमध्ये राहतात. ते १४ एप्रिल रोजी बांभोरी येथे दुपारी ३ वाजेच्या सुमारास परिवारासह गेले होते. संध्याकाळी ५. ३० ला त्यांची चुलत बहीण ज्योती चौधरी हिने फोन करून तुमचे घर उघडे आहे, सामान अस्ताव्यस्त पडले आहे म्हणून ललित खडके यांना माहिती दिली. त्यांनी बांभोरी येथून येऊन पाहणी केली असता घर अस्ताव्यस्त दिसले. कुलूप तुटलेले होते व लोखंडी कपाटाचे लॉक तोडलेले होते. त्यानुसार चोरी झाल्याचे लक्षात आले.
ललित खडके यांचे घरातून सोने चांदीचे दागिने, अंगठ्या तसेच रोख रक्क्कम अशी एकूण १ लाख १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार रविवारी ललित खडके यांचे फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भरवस्तीत चोरी झाल्याने आता पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.