रत्नागिरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आम्ही ऑनलाईन नव्हे तर प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असून याचे उत्तम परिणाम दिसून येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी येथील कार्यक्रमात केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सर्वसामान्यांचे हिताचे ३५० निर्णय आम्ही घेतले. जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे आमचे सरकार आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही परिस्थिती आम्हाला थांबवायची आहे. अडीच वर्षातील कारभार जनतेने पाहिला आहे. आम्ही घरी बसणारे मुख्यमंत्री नाही. पूर्वीसारखे स्पीडब्रेकर आम्ही काढून टाकले. आता गाडी सुसाट आहे. ऑनलाईन नाही आम्ही थेट फिल्डवर्क करत आहोत, असे शिदें म्हणाले.
आम्ही घरी बसून काम करणारे नाही, फेसबुक लाइव्ह, ऑनलाइन काम करणारे नाही. आम्ही घरा-घरात, गावागावात जाऊन काम करणारे आहोत असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. शेतीचं नुकसान झालं तेव्हा मी बांधावर नाही थेट शेतावर गेलो. तिथल्या सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासन आपल्या दारी या उपक्रमा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
आम्ही २४ तास काम करणारे कार्यकर्ते आहोत. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून उभा असला तरीही कार्यकर्ता म्हणून कालही काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे आणि उद्याही त्याच भूमिकेतून काम करत राहीन. काम करण्याची जी सवय आहे, बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी जी शिकवण दिली आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.