पारोळा प्रतिनिधी । आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे पारोळा व एरंडोल येथील नगरपालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या विकास कामांसाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असून यामुळे या दोन्ही पालिका क्षेत्रातील कामांना गती मिळणार आहे.
पारोळा व एरंडोल नगरपालिका क्षेत्राअंतर्गत निधी अभावी काही विकासकामे रखडली होती. ती कामे मार्गी लावण्यासाठी पालिकेला मर्यादा येत होत्या. तर दुसरीकडे ती कामे करण्याची गरज पाहता, आमदार चिमणराव पाटील यांनी मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या दोन्ही नगरपालिकांसाठी विशेष प्रयत्न सुरु केले. या दाेन्ही ठिकाणच्या दुर्लक्षित कामांना प्राधान्य देऊन शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दोन्ही नगरपालिकांसाठी प्रत्येकी ४ कोटी रुपये याप्रमाणे ८ कोटी मंजूर करून आणले अाहेत. यामुळे या मतदार संघात विकास कामांना वेग मिळणार आहे. पारोळा व एरंडोल शहरातील काही कॉलनी भाग हा आजही विकास कामापासून वंचित आहे. रस्ते, गटारी अभावी या भागातील रहिवाशांना विशेषतः पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात नेहमीच नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात. ही आवश्यकता पाहता या दोन्ही शहरातील काही रस्ते, गटारी, संरक्षक भिंत, सामाजिक सभागृह, शौचालयांची कामे या मंजूर निधीतून आता मार्गी लागणार आहेत. मुळात या दोन्ही पालिकेत भाजपची सत्ता आहे. तरी ही हा निधी मंजूर करून आणल्याने आमदार चिमणराव पाटील यांचे आभार मानले जात आहे.