मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – अमरावतीच्या खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांनी खार येथील निवासस्थानी देवघरात पूजा करताना व्हिडीओ शेअर केला. यात शिवसैनिकांना दरवाजापर्यंत उभं करुन आमच्या विरोधात कट रचला जात असल्याचे म्हणत, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
पवनपुत्र हनुमान, प्रभू श्री रामचंद्र भगवंताचा आशिर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, शांततेसाठी प्रार्थना केली. मातोश्री हे आमचे हृदयस्थान आहे. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत असून आज आम्ही मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणारच असा निर्धार यावेळी राणा दांपत्याने केला आहे.
तसेच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेला शनी असून, राज्यात सुख, शांत असावी. महाराष्ट्राची उन्नती व्हावी, या उद्देशाने हनुमान चालीसा वाचवण्यासाठी जर आम्हाला इतका विरोध केला जातोय. मराठी माणसाला हनुमान चालीसा वाचण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेचा दुरुपयोग करीत आहेत. आमच्याविरोधात आंदोलन करणारे शिवसैनिक हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे नसल्याचाही टोला आ. रवी राणा यांनी लगावला आहे.
शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचे असते तर हनुमान चालीसा वाचू दिली असती. महाराष्ट्राला लागलेला शनी संपवण्यासाठी आम्हाला मातोश्रीवर जाण्यासाठी आडकाठी केली नसती, परंतु या ठिकाणी पोलीस आम्हाला थांबवत आहेत. शिवसैनिकांना दरवाजापर्यंत उभं करुन आमच्या विरोधात कट रचला जात असल्याचेही आ. रवी राणा यांनी म्हटले आहे.