मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज्यात धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच उत्तर प्रदेशात मात्र दोन्ही समाजाच्या धार्मिक नेत्यांनी भोंग्यांचा आवाज कमी करण्यावर सहमती दर्शवत भोंगे उतरविले आहेत. यावरून आमच्या राज्यात ‘योगी कुणीच नाही आहेत ते फक्त सत्तेचे भोगी’ असा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यत भोंगे उतरवा असा इशारा दिला आहे. यावरून राज्याच्या राजकारणामध्ये धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप केले आहेत.
आवाहनामुळे भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निश्चित
मात्र दुसरीकडे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत हिंदू, मुस्लीम धर्मीय नेत्यांशी बैठक घेत चर्चा केली. त्यात भोंगे वापरा, मात्र त्याचा आवाज धार्मिक स्थळांच्या आवातापुरता मर्यादित असावा, इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन केले. त्यामुळे ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत तर ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निश्चित करण्यात आले.
‘आई जगदंबा सद्बुद्धी देवो’
यावरून राज यांनी, ठाकरे सरकावर निशाणा साधत ‘योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदनासह आभार’ व्यक्त करीत राज्यात योगी कुणीच नाही आहेत ते फक्त भोगी असे म्हणत ‘आमच्या सरकारला आई जगदंबा सद्बुद्धी देवो’ अशी प्रार्थना केली आहे.
मंदिरे ते मशिदींत आवाजावर मर्यादा
उत्तर प्रदेशात अयोध्येच्या सर्व मंदिरे ते लखनऊतील शिया मशिदींपर्यंत भोंगे न वाजविण्याची सकारात्मक भूमिका घेतली आहे. मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात भागवत भवन सकाळी पाच वाजता भोंग्यावरुन म्हटली जाणारी मंगल चरण आरती भोंग्यावर न वाजवण्याचा निर्णय घेण्यात आला असून अशाच प्रकारे अयोध्येसह अन्य शहरांतून देखील प्रतिसाद असून बहुतांश ठिकाणी स्वेच्छेने भोंग्यांच्या आवाजावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे.