मुंबई (वृत्तसंस्था) सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा बिहार पोलिसांच्या सध्या सुरू असलेल्या चौकशीचा कायदेशीर कोनातून तपास केला जात आहे. त्यांचा तपास योग्य दिशेने आहे की नाही हे आम्हाला माहिती नाही. यावर आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. त्यांनी आमच्याकडून हे प्रकरण ट्रान्सफर घ्यायला हवे होते. आमचा तपास योग्य दिशेने सुरु आहे, असल्याची माहिती मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे.
सुशांतच्या आत्महत्याप्रकरणाशी संबंधित माहिती देण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी परमबीर सिंह यांनी या प्रकरणाशी निगडीत अनेक मुद्द्यांची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी आधीच अपघाती मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. फॉरेन्सिक एक्सपर्ट, डॉक्टरांच्या टीमचा सल्ला घेतला आहे. आतापर्यंत ५६ जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच १३ आणि १४ जूनचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेजही आम्ही जप्त केले आहेत. परंतु पार्टी झाल्याचा एकही पुरावा आम्हाला मिळालेला नाही. सखोल तपास सुरु आहे. परंतु पोलीस निष्कर्षावर पोहोचलेले नाहीत. नैसर्गिक मृत्यू आणि संशयास्पद मृत्यू या दोन्ही बाजूने तपास केला जात आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबाचा जबाब नोंदवला आहे. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. तसेच सुशांत सिंह राजपूतनं १४ जूनला आत्महत्या केली. मात्र या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुशांतनं आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या घरात पार्टी झाल्याची चर्चा होती. मात्र तशी कोणतीही पार्टी झालेली नसल्याची माहिती परमबीर सिंह यांनी दिली. आम्ही या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र तसं काहीही हाती लागलं नसल्याचं परमबीर सिंह म्हणाले. मात्र या प्रकरणात काही घातपात झाला का, त्या अनुषंगानंदेखील तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.