मुंबई : वृत्तसंस्था । लोकप्रियतेच्या बाबतीत भारतीय रिझर्व्ह बँकेने कळस गाठला आहे. ट्विटर या सोशल मीडियावर रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलचे (https://twitter.com/RBI) १० लाख ५१३ फॉलोअर्स झाले आहेत. आबीआयने फॉलोअर्सचा जागतिक विक्रम नोंदवला आहे.
अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह आणि युरोपीयन सेंट्रल बँक यांच्या तुलनेत रिझर्व्ह बँकेची आर्थिक ताकद कमी आहे. तरीही लोकप्रियतेच्या निकषावर रिझर्व्ह बँकेने या दोन्ही बड्या बँकांना मागे टाकले आहे. रविवारी आरबीआयच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलच्या फॉलोअर्सनी १० लाख ५१३ ही संख्या गाठली आणि विश्वविक्रम केला. जगातील सर्वात सक्षम बँक असलेल्या आणि २००९ मध्ये ट्विटरवर आलेल्या यूएस फेडरल रिझर्व्हचे ६.७७ लाख फॉलोअर्स आहेत. जगातील तिसऱ्या क्रमांकाची समर्थ बँक असलेल्या बँक ऑफ जपानचे फॉलोअर्स केवळ २८,९०० आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या बाबतीत २५ मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउनच्या पहिल्या सात आठवड्यांत ट्विटर फॉलोअर्सची संख्या दीड लाखांहून अधिक झाली. @RBI या मुख्य ट्विटर हॅण्डलव्यतिरिक्त आरबीआयचे RBI says हेदेखील ट्विटर खाते आहे.
८५ वर्षे जुन्या रिझर्व्ह बँकेने आपले स्वतःचे अधिकृत हॅण्डल ट्विटरवर उशिराने, जानेवारी २०१२ मध्ये उघडले. @RBI या ट्विटर हॅण्डलवर २७ सप्टेंबर रोजी ९.६६ लाख फॉलोअर्स झाले होते. मात्र आता त्यांनी १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यानिमित्त आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. शक्तिकांत दास यांचे स्वतःचे ट्विटर हॅण्डल असून त्याचे १.३५ लाख फॉलोअर्स आहेत.