नवी दिल्ली / वृत्तसंस्था / राहुल गांधी यांनी लडाखमधील चिनी सैन्यांच्या उपस्थितीबाबत विचारणा करताना आपलं सरकार भारतीय लष्करासोबत आहे की चिनी लष्करासोबत ? असा प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना टोला लगावत ‘आप क्रोनोलॉजी समझिए’ असं म्हटलं आहे. मोदींनी चिनी लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडली नाही असं वक्तव्य केलं त्याच्या काही दिवसांनी केंद्र सरकारने चीनमध्ये स्थित असणाऱ्या बँकेकडून मोठं कर्ज घेतल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी अधिवेशनात अनुपस्थित असले तरी सतत केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी देशाबाहेर गेल्या असून राहुल गांधीदेखील त्यांच्यासोबत आहेत.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “तुम्ही क्रोनोलॉजी समजून घ्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणीही नियंत्रण रेषा ओलांडली नाही असं वक्तव्य केलं. त्यानंतर चीन स्थित बँकेकडून मोठं कर्ज घेतलं. त्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी चीनने आपली जमीन बळकावली असल्याचं सांगितलं. आणि आता केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणतात घुसखोरी झालीच नाही”. ट्विटच्या शेवटी राहुल गांधी यांनी मोदी सरकार भारतीय लष्करासोबत आहे की चिनी अशी विचारणा केली आहे.
“मागच्या सहा महिन्यात भारत-चीन सीमेवर घुसखोरीची घटना घडलेली नाही” असे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लिखित उत्तरात सांगितले. राज्यसभेतील भाजपा खासदार डॉ. अनिल अग्रवाल यांच्या प्रश्नावर नित्यानंद राय यांनी हे उत्तर दिले.
राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना घुसखोरी या शब्दाचा वापर केला नव्हता. १९९३ ते १९९६ दरम्यान दोन देशांमध्ये झालेल्या कराराचे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अनादर केला असे राजनाथ म्हणाले होते. घुसखोरी, अतिक्रमण आणि आक्रमण या शब्दांमध्ये फरक असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं.