आता मुंबईत नारायण राणे आणि शिवसेना आमने – सामने

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । जन आशीर्वाद यात्रेच्या प्रारंभी नारायण राणे यांना अभिवादनासाठी  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊ देणार नाही अशी भूमिका खासदार विनायक राऊत यांनी घेतल्यामुळे आता पुन्हा नारायण राणे आणि शिवसेना आमने सामने येणार आहेत

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा १९ ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. राणे हे विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दादर येथील चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. मात्र या कार्यक्रमाआधीच आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दादादरमधील शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाला राणेंना भेट देऊ देणार नाही असं म्हटल्याने राणे आणि शिवसेना पुन्हा आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

 

विनायक राऊत यांनी ट्विटरवरुन राणेंवर टीका केलीय. “नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. राणेंसारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊ देणार नाहीत,” असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.

 

मुंबईत होणाऱ्या या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राणे हे शिवसेनेला आव्हान देणार आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपकडून या यात्रेचा उपयोग करून घेतला जाणार आहे.

 

Protected Content