नवी दिल्ली वृत्तसंस्था । दिल्लीतील यशानंतर आम आदमी पक्षाने देश पातळीवर व्याप्ती वाढविण्याची तयारी केली असून यासाठी ‘सकारात्मक राष्ट्रवाद’ या संकल्पनेवर भर देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत जोरदार विजय मिळवल्यानंतर आता आम आदमी पक्षाने देशात आपली व्याप्ती वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते गोपाल राय यांनी याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, पक्षाने सकारात्मक राष्ट्रवाद हा मुद्दा घेऊन देशभरात जाण्याचे ठरवले आहे. त्यानुसारच पक्षाचा विस्तार करण्यासंदर्भात राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पंजाबसह काही राज्यातील निवडणुका लढविणार आहे. भाजपचा राष्ट्रवाद नकारात्मक आहे. मात्र आम आदमी पक्ष सकारात्मक राष्ट्रवादाच्या मुद्दावर पक्षाचा विस्तार करणार आहे. नागरिक आपच्या राष्ट्र निर्माण अभियानात ९८७१०१०१०१ या क्रमांकावर मिस कॉल देऊन सामील होऊ शकतात. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक तयार करणार आहोत. त्यानंतर पक्ष देशातील स्थानिक निवडणुका लढवणार आहे. राष्ट्रीय पातळीवर मोठ्या संख्येने स्वयंसेवक आणि देशभरात पक्षाचे कॅडर निर्माण करण्याचे पक्षाचे धोरण आहे. त्यातूनच संघटनेचा विस्तार करण्याची योजना बनविणार असल्याचे राय यांनी म्हटले आहे.
गोपाल राय यांनी सकारात्मक राष्ट्रवादी या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात काम केले असून यावरील त्यांचे पुस्तक मोठ्या प्रमाणात लोकप्रियदेखील झालेले आहे. या पार्श्वभूमिवर, आता हाच विचार घेऊन आम आदमी पक्ष देशभरात आपले पाळेमुळे मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती गोपाल राय यांनी दिली आहे. आपची महत्वाची बैठक उद्या अर्थात रविवारी होत असून यात सकारात्मक राष्ट्रवादावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहितीसुध्दा गोपाल राय यांनी दिली आहे.