जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा येथील आठवडे बाजारात आलेल्या चोरट्यांच्या टोळीकडून तब्बत आठ जणांचे आठ मोबाईल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश पुंडलिकराव सूर्यवंशी (वय-५१) रा. विद्युत कॉलनी, जळगाव हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. पिंप्राळा येथे बुधवारी आठवडे बाजार भरत असतो. बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी राजेश सुर्यवंशी हे बुधवारी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता गेले. बाजारात भाजीपाला खरेदी करतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिश्यातील ११ हजाराचा महागाडा मोबाईल चोरून नेला. दरम्यान त्यांनी अधिक चौकशी केली असता याच बाजारातील इतर ७ जणांचे देखील महागडे मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेले. यासंदर्भात रामानंदनगर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी आठवडे बाजारातून संशयित आरोपी सिद्धार्थ श्रावण चव्हाण, करणकुमार चंचल चव्हाण, राहुल कुमार चव्हाण, अर्जुनकुमार चंचल चव्हाण, अजय गंगाराम चव्हाण सर्व रा. खदान रोड, अकोला या पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेतले. त्यांच्यावर रात्री ११.३० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात राजेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.