नवी दिल्ली : वृत्तसंस्था / काँग्रेस नेतृत्वाच्या मुद्द्यावरून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रामुळे उद्भवलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुलाम नबी आझाद, मोतीलाल व्होरा, मल्लिकार्जुन खरगे, अंबिका सोनी या ज्येष्ठ नेत्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदावरून शुक्रवारी हकालपट्टी करण्यात आली.
गुलामनबी आझाद हरियाणाचे प्रभारी होते. भाजपचा मुकाबला करायचा असेल तर काँग्रेसला उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसमध्ये समग्र बदल व्हायला हवा. खालच्या स्तरापासून वरपर्यंत नेतृत्वात बदल करण्यात यावा,’ अशी मागणी करणारे पत्र आझाद, अंबिका सोनी, कपिल सिब्बल आदी २३ नेत्यांनी लिहिले होते. या पत्रावरून काँग्रेसमध्ये वाद झाला होता. अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शविली होती, राहुल गांधी पक्षाच्या बैठकीत या नेत्यांवर गंभीर आरोप केल्याचे बोलले गेले. तेव्हापासून पक्षात खदखद होती.
शुक्रवारी पक्षात महासचिव आणि प्रभारींमध्ये बदल करण्यात आले. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी हे बदल जाहीर केले. उपरोक्त चार नेत्यांना सरचिटणीसपदावरून हटवताना पी. चिदंबरम, रणदीप सूरजेवाला, तारिक अन्वर आणि जितेंद्र सिंह यांना काँग्रेस कार्यकारिणीचे नियमित सदस्य म्हणून नेमण्यात आले आहे. आझाद यांचे नियमित सदस्यत्व मात्र कायम ठेवण्यात आले आहे. कार्यकारणीतील लुइझिनो फालेरो, मोतीलाल व्होरा, अधीररंजन चौधरी व तमरध्वज साहू यांची जागा हे चौघे घेतील. ए. के. अँटनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, के. सी. वेणूगोपाल, मुकुल वासनिक आणि रणदीप सूरजेवाला या सहा जणांची विशेष समिती स्थापण्यात आली असून, ही समिती सोनियांना संघटनात्मक व पक्षात्मक पातळीवर मदत करेल.
महाराष्ट्राच्या प्रभारीपदी एच.के. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी खरगे हे महाराष्ट्राचे प्रभारी होते. खरगे यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली.