जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित मागण्या पुर्ण होत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने शहरातील जी.एस. मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन, सेवानिवृत्ती लाभ, कोशन ट्रॅकर मराठीत करणे, नवीन दर्जेदार मोबाईल देणे यासंदर्भात दिलेले आश्वासन भंग केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, पोषण आहार ट्रॅकर मराठीत करावा, कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करावी, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात यावा, अंगणवाडी सेविकांना शासनाचे काम करण्यासाठी दर्जेदार मोबाईल देण्यात यावा, आजारपणासाठी पगारी रजा मिळावी, दरमहा पेन्शन देण्यात यावे, उन्हाळी सुट्ट्या मिळाव्यात, कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन मिळावे, अंगणवाडी विभागाच्या रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात, पोष्ण आहार व अमृत आहार यांचे दर वाढविण्यात यावे यासह इतर प्रलंबित विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात प्रेमलता पाटील, ज्योती पाटील, साधना शार्दुल, मिनाक्षी कोटोल, विजया बोरसे यांच्यासह जिल्ह्यातील आंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.