धुळे : वृत्तसंस्था । बुलडाणा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल वादग्रस्त विधान करुन नवा वाद ओढवून घेतला आहे.
आमदार गायकवाड यांनी अॅट्रॉसिटी कायद्याबाबत धक्कादायक वक्तव्य केल्याचा एक व्हीडिओ नुकताच समोर आला आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करून त्यांना कडक शासन करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाने केली आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी खामगाव तालुक्यातील चितोडा, अंबिकापूर या गावातील दोन समाजातील कौटुंबिक वाद झालेल्या कुटुंबाला भेट दिली असता त्यांनी गावकऱ्यांशी बोलतांना अॅट्रोसिटीवरुन वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधान केले. या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. कुणी खोट्या अॅट्रोसिटी भीती दाखवत असेल तर त्याच्याविरोधात तुम्ही दरोड्याची तक्रार द्या, असं विधान करुन एकप्रकारे त्यांनी गावकऱ्यांना चिथावणी दिली होती.
आज आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करत धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात त्यांच्या पोस्टरला चपला मारत, ते पोस्टर जाळण्यात आले. यावेळी रिपाइं (खरात गट) उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरण ईशी, जिल्हाध्यक्ष विशाल पगारे, शहराध्यक्ष नागिंद मोरे, सचिन खरात, भैया खरात, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वाघ कुटुंबावर 19 जूनला हल्ला झाला होता. ॲट्रॉसिटीचा धाक धाकवत चितोडा येथील गावगुंड पोत्या उर्फ रमेश हिवराळे याने गावात उच्छाद मांडलाय. बुधवारी चितोडा गावाला बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भेट दिली. हल्ला झालेल्या वाघ कुटुंबाला आम्ही तुमच्यासोबत आहोत. घाबरण्याची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी धीर दिला.
बोलण्याच्या नादात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. भविष्यात इथे आणखी असा हल्ला झाला तर मी स्वतः 10 हजारांची फौज घेऊन येईन आणि एका फटक्यात संबंधितांना सरळ करेन. अन्याय सहन करू नका, कायदा ठेचत नसेल तर आपण ठेचा. सगळी शस्त्र अस्त्र, सर्व ताकद पुरवीन, असं वादग्रस्त वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलं.
ॲट्रॉसिटी कायद्याचा कुणी धाक दाखवत असेल तर तुम्हीही त्याच्याविरोधात दरोड्याची तक्रार द्या. खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना संघटित होऊन उत्तर द्या, असं म्हणत चितोड्यात येण्यासंदर्भात आपल्याला थेट ‘मातोश्री’वरून आदेश आल्याचे त्यांनी सांगितले.