मुंबई प्रतिनिधी । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून कोरोनाच्या प्रतिकारासाठी काही उपाय सुचविले असून यात अॅग्रेसिव्ह टेस्टींगचा अवलंब करण्याचे सुचविण्यात आले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्र लिहून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोरोनाच्या प्रतिकारासाठी काही उपाय सुचविले आहेत. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, १५ एप्रिल २०२० रोजी मुंबई महापालिकेने लक्षणं नसलेल्या व्यक्तींची करोना चाचणी बंद करण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी राज्याच्या सरासरीच्या कितीतरी अधिक नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणूनच आयसीएमआरच्या नव्या निर्देशांप्रमाणे अॅग्रेसिव्ह टेस्टिंग हीच रणनीती आता वापरावी, अशी माझी विनंती आहे. लक्षणं नसलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींसंदर्भात १०० टक्के चाचण्या केल्याच पाहिजेत, असे दिशानिर्देश आयसीएमआरनं स्पष्टपणे दिले असताना मुंबई महापालिकेनं मात्र आवश्यकता वाटली तर करता येईल, असा आदेश काढला आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, राज्यात उपलब्ध केसेसपैकी ६३ टक्के रूग्ण हे लक्षणं नसलेले आहेत. तर रूग्णालयात दाखल झालेल्यांपैकी ७९ टक्के रूग्ण हे लक्षणं असलेले आहेत. याचाच अर्थ लक्षणं नसलेल्या व्यक्तींच्या चाचण्या न करण्याचा निर्णय किती घातक ठरू शकतो, हे स्पष्ट होते. त्यामुळे सांख्यिकीदृष्ट्या ही रूग्णसंख्या कमी दिसेल आणि प्रत्यक्षात मात्र धोका वाढेल. त्यामुळे असे निर्णय करणे योग्य होणार नाही. १८ एप्रिल २०२० रोजी मुंबईतील कोविड पॉझिटिव्ह रूग्णांची राज्य सरकारने दिलेली संख्या १८३ इतकी आहे. हीच संख्या मुंबई महापालिकेने ८७ इतकी दिली. मात्र, त्याचवेळी मुंबई महापालिकेने तळटीप टाकून ४ खाजगी प्रयोगशाळांनी १२ ते १५ एप्रिल २०२० या दरम्यान केलेल्या चाचण्यांचा अहवाल आज दिला असून, त्यात ३०२ अहवाल पॉझिटिव्ह आले, असे सांगितले आहे. मुंबई महापालिकेने तळटिपेत दाखविलेले व्यक्ती हे यापूर्वीच रूग्णालयात दाखल झालेले असल्याने रूग्णालयात दाखल या रकान्यात आहेत. मात्र ते करोना पॉझिटिव्हच्या एकूण संख्येत समाविष्ट करण्यात आले आहेत का? हे समजत नाही. आणि तसे न करण्याचे कारणही लक्षात येत नाही. महापालिकेने ही संख्या ८७ अधिक ३०२ दाखविणे आवश्यक होते. त्यामुळे एकूणच रिपोर्टींगमध्ये त्रुटी का येत आहेत, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एकूण ही सर्व परिस्थिती पाहता कोविड पॉझिटिव्हच्या संख्येची लपवालपवी करण्याचा प्रयत्न का होतो आहे का? हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आपण स्वत: यात गांभीर्याने लक्ष द्यावे व लक्षणं नसलेल्या व्यक्तींची चाचणी तसेच कोविड पॉझिटिव्हचे उचित रिपोर्टिंग होईल, याकडे लक्ष द्यावे. यातूनच प्रश्नाची व्याप्ती लक्षात घेऊन आपल्याला आपली लढाई योग्य दिशेने नेता येईल, असें देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००