अहिराणी भाषा लोकांच्या काळजाला भिडणारी : सुदाम महाजन

 

चोपडा (प्रतिनिधी) अहिराणीतील ओव्यांमधून जीवनाचा अर्थ खूप सोप्या शब्दात मांडला आहे. बाप आणि लेकीचे नातं हळूवार उलगडण्यात आले आहे. लोकांच्या काळजाला भिडणारी भाषा अहिराणी आहे. अहिराणी भाषेत नात्यांना अतिशय समर्पक शब्द आहेत, असे प्रतिपादन दोंडाईचा येथील तहसीलदार व अहिराणी भाषेचे अभ्यासक सुदाम महाजन यांनी केले.

 

चोपडा येथील महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या शाखेतर्फे आयोजित ‘प्रियजन स्मृती व्याख्यानमाले’चे पहिले पुष्प गुंफताना ते ‘अहिराणी लोकवाड.मयातील गोडवा’ या विषयावर बोलत होते. पंकज नगर येथील पंकज बालसंस्कार केंद्राच्या आवारात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मंचावर तहसीलदार अनिल गावित, मसाप विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष घनश्याम अग्रवाल, अध्यक्ष अशोक नीलकंठ सोनवणे, कार्याध्यक्ष विलास पं. पाटील, डॉ विकास हरताळकर, रमेश शिंदे, पत्रकार चंद्रकांत पाटील श्रीकांत नेवे, लतिष जैन यांच्यासह व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाचे प्रायोजक अॅड. डी. पी. पाटील, दिपक लोहाणा, राजेश पाटील हे उपस्थित होते.

 

आपला विषय मांडत असताना सुदाम महाजन पुढे म्हणाले, जिथे आपला सतत वावर – राबता असतो त्याला ‘वावर’ म्हणतात तर जी नुसती जमीन असते ती ‘शेती’ असा अर्थ अहिराणी भाषेतून सोप्या पद्धतीने मांडला आहे. अहिराणीतील गोडवा आपण विसरत चाललो आहे.  अहिराणी तील लेख पांडव लेणीत आढळतो. अहिराणी भाषेचा इतिहास दोन हजार वर्षापूर्वीचा आहे. जे जेते असतात त्यांची भाषा जिवंत माणसाना बोलावी लागते. आज सुमारे पाच कोटी लोकांची बोलीभाषाा अहिराणी आहे. जनगणनेच्या वेळी प्रत्येकाने अभिमानाने आपली मातृभाषा अहिराणी कशी नोंदवावी ज्यामुळे आपल्या भाषेबद्दल चा अभिमान जागृत करून या भाषेेला उर्जितावस्था आणता येईल.

सुदाम महाजन यांनी अहिराणीतील किस्से, प्रसंग सांगून मनमुराद हसवले. यावेळी प्रकाश पाटील (पिंगळवाडे) यांची ‘ तू ई जाय कानी कानी…’ ही अहिराणी गझल व इतर गाणी प्रभावी पद्धतीने सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम पाटील यांनी तर प्रास्ताविक शाखेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, वक्त्यांचा परिचय पंकज शिंदे यांनी व आभार प्रदर्शन एस. बी. पाटील यांनी केले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विनोद पांडुरंग पाटील (कस्तुरबा विद्यालय), साहेबराव पाटील (प्रताप विद्या मंदिर), शिवाजी काशिनाथ आव्हाड (जि. प. शाळा जिरायतपाडा) या शिक्षकांना सेवा मंडळाच्या ‘सेवा शिक्षक गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यशस्वितेसाठी संजय बारी, गौरव महाले, पंकज नागपुरे, आर. डी. पाटील, प्रसाद वैद्य, जयश्री पाटील, योगिता पाटील यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content