अहमदनगर : वृत्तसंस्था । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून राज्य सावरत असतानाच धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात नऊ हजारांहून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.
मे महिन्यात अहमदनगरमधल्या नऊ हजार ९२८ अल्पवयीन मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्ण बाधित होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने लहान मुलांमध्येही कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखर्णा यांनी दिली. ते म्हणाले, एप्रिलमध्ये सात हजार ७६० लहान मुलांना कोरोनाची लागण झाली होती. पण कोणाचीही प्रकृती गंभीर असल्याचं अद्याप आढळून आलेलं नाही.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना अधिक धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. पूर्वतयारी म्हणून यासाठी बालरोगतज्ज्ञांचे कृतिदल तयार करण्यात आले आहे. दहा बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेल्या या दलाच्या अध्यक्षपदी पी.डी. हिंदुजा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास प्रभू यांची निवड केली आहे.तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना धोका असला तरी एकूण रुग्णांपैकी ४ ते ५ टक्के बालकांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते. परंतु हे प्रमाण टक्क्यांमध्ये आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आकड्यांमध्ये संख्या अधिक असू शकते, असे डॉ.सुहास प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.
दोन महिन्यांमध्ये कर्नाटकमध्ये ९ वर्षांखालील ४० हजार मुले बाधित झाली. वर्षभरात ४३ लहान मुलांचा मृत्यू झाला. दिल्लीमध्ये दोन महिन्यांत २९ बाधित बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहिल्या लाटेत बालके विषाणूपासून सुरक्षित होती. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये बालकांनाही त्रास जाणवत आहे.