मुंबई : वृत्तसंस्था । हाथरस घटना आणि नंतर जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनीच कायदा हातात घेतला आणि पीडितेच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. असे याआधी देशात कधीच कुठे घडले नाही. देशभरात संताप ही जनतेची रिअॅक्शन योग्यच आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
हाथरस येथे पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना रोखण्यात आलं. त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली खाली पाडलं. नंतर अटकही करण्यात आली. या प्रकारावर पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पोलिसांनी पीडित तरुणीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना का दिला नाही? आता पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या नेत्यांना का अडवलं जात आहे? याचाच अर्थ उत्तर प्रदेशात कायद्याला कवडीचीही किंमत नाही, हे स्पष्ट होत आहे, असे पवार म्हणाले.
महाराष्ट्रात अशी एखादी घटना घडल्यास त्यावर तात्काळ अॅक्शन घेतली जाते मात्र उत्तर प्रदेशात लागोपाठ दोन घटनांमध्ये तसे काही दिसले नाही. ठोस अशी काहीच कारवाई होत नसल्याने तेथील राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा संदेश सर्वत्र गेला आहे, असेही पवार यांनी पुढे सांगितले.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे शांततेच्या मार्गाने हाथरसला निघाले होते. पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी ते जात होते. त्यांना तिथे जायला देण्यात काहीच हरकत असण्याचे कारण नव्हते. मात्र त्यांना रोखले गेले. त्यांच्यासोबत जे काही घडले ते योग्य नाही, अशा शब्दांत पवार यांनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप नोंदवला.