जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील उस्मानियॉ पार्क परिसरातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर शहर पोलीसांनी कारवाई केली आहे. पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता शहर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिवाजी नगरजवळील उस्मानियॉ पार्क परिसरातून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सुचना दिल्या. शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पथकाने कारवाई करत ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ बीजी ००२७) वर धडक कारवाई केली. वाळू वाहतूकीबाबत कोणताही परवाना आढळून आला नाही. अखेर पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक नरेंद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी ४ वाजता ट्रॅक्टर चालक नितीन अनिल कोळी (वय-२८) रा. डिकसाई, ता.जि.जळगाव याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.