चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणेसिम येथील तितुर नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी विरोध करून हाणून पाडला.
हिंगोणेसिम येथील बंधार्यालगत तितुर नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू आहे. याबाबत तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. नदीपात्रात जेसीबीद्वारे वाळूचे उत्खनन करून ती डंपरमध्ये भरली जात असल्याचे दिसून आल्याने ग्रामस्थांनी एकत्र येत नदीपात्रात धाव घेतली. ग्रामस्थांना पाहून तस्करांनी पळ काढला. संतप्त ग्रामस्थांनी डंपरच्या काचा फोडल्या. तितुर नदीपात्रातून वाळू माफियांनी बेसुमार वाळू उपसा केला आहे. हिंगोणे येथील नदीपात्रापासून ते चाळीसगाव शहराच्या हद्दीपर्यंत वाळू तस्करांनी वाळू उत्खनन करून कोट्यवधींची वाळू वाहून नेली आहे. दरम्यान, अवैध उत्खनन प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.